#वाडवळी_मसाला (वर्षभराचा रोजच्या वापराचा)
️
अनेकजण ब-याच दिवसांपासून वाडवळी मसाल्याच्या प्रमाणांबाबत मागणी करत होते. आज ती मसाला जिन्नसांची प्रमाणे देत आहोत. १९८६ पासून लक्ष्मी मसाले, एडवण येथे अनेक समाजाचे आणि विविध पट्ट्यांतून तयार मसाले, मिरच्या, हळद आणि मसाल्याचे सामान घेण्यास येतात. अनेक कुटुंबे, पिढ्या मसाल्याचा हंगाम सुरू झाला कि दुरून खास न चुकता एडवणला येतात. मसाल्यांसोबतच तांदूळ, कण्या, पीठे, कडधान्ये, चिंच, मुखशुद्धी चे प्रकार, लोणची, पापड आणि साठवणूकीच्या वस्तू घेऊन जातात. ह्या इतक्या वर्षांच्या मसाला पावती बनवण्याच्या अनुभवातून विविध समाजाची, वर्षभराच्या मसाल्यांची प्रमाणे आपल्याला माहिती झाली आहेत. ती ह्या मसाल्यांच्या मालिकेतून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. थोड्याफार फरकाने ही प्रमाणे घराघरांच्या खाण्याच्या आवडीनुसार वेगळी असू शकतात, ह्याची नोंद घ्यावी. तुमच्याकडे वेगळी कृती असल्यास नक्की Comment मधे लिहा. आम्ही नक्की Try करू आणि पुढच्या लेखात लिहू. :)
तर वर्षभराचा वाडवळी मसाला प्रमाणासोबतच थोडीफार वाडवळी खाद्यसंस्कृती समजुन घेऊया.
तर वाडवळ म्हणजेच सोमवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाची स्वयंपाकाची एक आगळी खासियत असलेली पध्द्त आहे. वाडवळांमधे सोमवंशी, सुर्यवंशी, चौकळशी, पाचकळशी, पानमाळी अशा जाती-पोटजाती आहेत. स्वयंपाकाच्या पध्दती थोड्याबहुत फरकाने सारख्याच... आमचा हा समाज मुंबई, ठाणे पासून डहाणू पुढपर्यत विस्तारला आहे.
खाण्यापिण्याच्या सवयीबाबत चोख आणि चवीने खाणारे म्हणून वाडवळ प्रसिद्ध! बहुतांशी वाडवळ सामिष खातात. बागायती आणि शेतीवाडी बाळगून असलेल्या वाडवळांची खाद्यसंस्कृतीदेखील खुप चविष्ट आणि समृध्द आहे. वाडवळांमधे, मांसाहारी व शाकाहारी दोन्ही प्रकारचे बहुतांश पदार्थ बनवायला सोपे पण चमचमीत असतात. वाडवळ हे शेती वाडी करणारे आणि विशेषतः समुद्राला लागून असलेल्या भागात/ पट्ट्यात राहणारे त्यामुळे आहारात ताज्या भाज्या, भाकरी-भात आणि मासे यांचे प्रमाण विशेष. पुर्वपारापासून शेती-वाडी-बागायत-दुग्धव्यवसायात, खाऊची पाने हे व्यवसाय मुख्यत्वे वाडवळ समाज करत असे. घरातील पुरूषांसोबतच, महिलाही शेतातील अनेक कामांना हातभार लावत. ताजा भाजीपाला, शहाळी-नारळ, केळी आणि इतर फळे, निरनिराळी फुले, केळीची पाने-खांब जवळच्या बाजारपेठेत किंवा मोठाले गाठोडे घेऊन पार मुंबई वैगरे शहरातही महिलावर्ग सहज प्रवास करत असे. मग अशावेळी घरची कामे, स्वयंपाक भराभर उरकण्याकडे कल असे. म्हणून आमची कालवणे, भाज्या ह्या अगदी सरळसाध्या पध्द्तीने, झटपट होणा-या असतात आणि तरीदेखील चविष्ट! ️ शेतीमधे तांदळाचे म्हणजेच भाताचे मुख्य उत्पादन. त्यामुळे चमच्याने किंवा हाताने तव्यावर फिरवलेली तांदळाची भाकरी आणि भात हे ओघाने आलेच.
आणि वाडीमधे लावलेल्या वांगी, टाॅमेटो, शेवग्याच्या शेंगा, दुधी, शिराळा, पडवळ, गवार, मेथी, मिरच्या, पालेभाज्या, उळपातीचा कांदा, केळी, केळफुलं, वालाचे गोळे, कोथिंबीर, अळू, देठ, कडवे वाल, गलके, कोबी, फ्लाॅवर अशा सर्व भाज्यांचा स्वयंपाकात वापर असतो.🥥🧅️🧄 समुद्राकाठी वसलेले असल्याने ताजे मासे आणि सुके मासे दोन्ही प्रकार जेवणात असतात.🦪🦞🦈 आणि ताज्या भाज्यादेखील आम्ही ओल्या किंवा सुक्या मासळीमधे वापरतो. परसातच पाळलेल्या कोंबड्या म्हणून चिकन-मटण देखील सहजच आले जेवणात...आणि गावठी कवठे म्हणजेच अंडी....🥚आम्ही वाडवळ चिकन, मटणामधे बटाटा टाकतो म्हणून अनेकांना विचित्र वाटते पण एकदा वाडवळी चिकन मटण खाल्ले आणि मटणाच्या रस्स्यात मुरलेल्या बटाट्याची चव घेतली तर गंमत कळेल.
सणासुदीला करायच्या गोड पदार्थामधे रवळी, नारळवडी, पानगी, तांदळाची खीर, केळ्याचे गोड वैगरे नारळ/ तांदळाचा वापर असलेले पदार्थ असतात.
कडव्या वालाचे बिरडे, शेंग-वांग-बटाट-गोळे भाजी, शिराळा-चणाडाळ भाजी, भेंडीचा पोवळा, दुधी-बटाटा-टाॅमेटो आमटी, मिरचीवर परतलेली पालेभाजी, उकडहंडी, भरली भेंडी, केळफुलाची भाजी, कच्च्या केळ्याची भाजी, गलक्याची भजी, आंब्याची बाठवणी, उसळी असे अनेक शाकाहारी भाज्यांचे प्रकार वाडवळांमधे वरचेवर असतात.
मास्यांमधे आले-लसूण पेस्ट आणि तिखट-मीठ-मसाला-चिंच आणि तांदळाचे किंवा रव्याचे पीठ लावून तळलेले मासे, पातळसर कालवण किंवा सुके खोबरे भाजून वाटण लावून केलेले थोडेसे जाडसर असे कोलंबी, बोयमासा, बोंबील, पापलेट, मांदेळी, घोळ मासा, खा-या मास्याचे कालवण, किंवा कांद्यावर परतलेली कोलंबी आणि कालवे असे प्रकार असतात. वांगे किंवा दुधीदेखील कोलंबटासोबत (लहान कोलंबी) भाजीत घालतात. आमची कोलंबी-आंबा भाजी तर खुपच प्रसिद्ध आहे. सुकवलेल्या मास्यांबरोबर देखील काही भाज्या आम्ही वापरतो.
भाकरी/ वडे/ चांदणी (इडलीसारखी पण ताडी घालून बनवलेली) सोबत चिकन रस्सा, मटण रस्सा, चिकन सुक्के, चिकन भुजिंग, चिकन चे सुप ह्या आमच्या खास वाडवळी चवीच्या पाककृती! ️
निरनिराळ्या शाकाहारी आणि मांसाहारी तसेच फराळी पदार्थांचा उत्कृष्ट खजिना वाडवळी सुगरणींनी जोपासला आहे. वसई, विरार-आगाशी, बोर्डी, सफाळे-केळवा-माहिम, चिंचणी कडील महिलांचा वाडवळी पाककृती बनवण्यात विशेष हातखंडा मानला जातो. कुलदेवतेच्या घरजत्रेदिवशीदेखील खास कुलाचार आणि नैवेद्य असतो. शेतीवाडी करणारे म्हणून, आवणी- कापणीवेळी अनेक गडीमाणसे पुर्वी जेवायला असत. म्हणून मसाला जास्तच बनवत असत.
चिंचा खारवून मोठ्या प्रमाणात भरून ठेवल्या जातात. आंबटपणासाठी, कोकम/लिंबापेक्षा चिंचेचा सढळ वापर आमच्या पदार्थात असतो. चिंचकढी हा प्रकार आम्ही भातावर घेऊन सारासारखा खातो. आंबोशी हा सुकवलेल्या आंब्याचा प्रकार आणि खारवलेले आंबे (खा-या पाण्यात कै-या वर्षभर वापरण्यासाठी भरतात) उन्हाळ्यात कैरीचा वापर स्वयंपाकात सढळहस्ते असतो. नारळाच्या दुधाचा किंवा खोब-याचा वापर मात्र जेमतेमच...
लक्ष्मी मसाले, एडवण प्रस्तूत मसाला मालिका:
मसाला क्रमांक: २
वाडवळी मसाला:
वर्षभरासाठी बनवायचा रोजच्या वापराचा खास वाडवळी मसाला हा मध्यम तिखट असतो. आणि मध्यम लालसर रंगाचा. पण आजकल काश्मिरी मिरची पण वापरली जाते त्यामुळे रंग सुरेख लाल येतो. अगदी दाट रस्से किंवा कालवणे आमच्याकडे बनत नाहीत त्यामुळे मसाल्यामधे जास्त प्रमाणात तीळ, खसखस, खोबरे ह्यांचा वापर नसतो.
चला तर मग आज आपण वाडवळी मसाल्याचे प्रमाण पाहणार आहोत. हे एक किलोचे म्हणजे एक किलो मिरचीचे प्रमाण आहे. साधारण २ किलोच्या आसपास मसाला तयार होतो. वर्षभराचे भरण्यासाठीच्या मसाल्यासाठी उत्तम हंगाम जानेवारी ते मे महिना, कारण ऊन छान असते आणि वाणेही उत्तम उपलब्ध असतात.
वाडवळी मसाला साहित्य:
१. पाटणा/पांडी/गुंटूर मिरची: २५० ग्रॅम
२. बेडगी मिरची: ५०० ग्रॅम (संकेश्वरी मिरचीदेखील वापरायची असल्यास बेडगी २५० ग्रॅम आणि संकेश्वरी २५० ग्रॅम वापरा.)
३. काश्मिरी मिरची: २५० ग्रॅम
४. सेलम हळकुंड: ५० ग्रॅम
५. धणे: १५० ग्रॅम
६. जीरे: १२५ ग्रॅम
७. राई/मोहरी: १५० ग्रॅम
८. लवंग: २५ ग्रॅम
९. दालचिनी: १२५ ग्रॅम
१०. काळेमिरे: १०० ग्रॅम
११. खसखस: ५० ग्रॅम
१२. मेथी: २५ ग्रॅम
१३. बडीशेप: २५ ग्रॅम
शाही मसाले सामान:
१४. हिरवी वेलची: २५ ग्रॅम
१५. मसाला वेलची: १५ ग्रॅम
१६. जायवंत्री: १५ ग्रॅम
१७. रामपत्री: १५ ग्रॅम
१८. शहाजीरे: १५ ग्रॅम
१९. बादियान: २० ग्रॅम
२०. तमालपत्र: २० ग्रॅम
२१. जायफळ: १ नग
२२. त्रिफळा: १५ ग्रॅम
२३. नाकेशर: १० ग्रॅम
२४. कबाबचिनी: १० ग्रॅम
२५. दगडफुल: १५ ग्रॅम
२६. चणा: २५ ग्रॅम (चणा हा ऐच्छिक आहे. आमच्या भागातील काही वाडवळ मसाल्यामधे चणा वापरतात.)
२७. हिंग खडा: २५ ग्रॅम (ह्यातले दोन लहान खडे अखंड ठेवा. आणि मसाला तयार झाल्यावर वरती ठेवा.)
सर्व जिन्नस जवळपासच्या दुकानांमधून घेऊन येणे. आता मसाला बनवण्यास सुरुवात करूया.
१. मसाले बनवण्यासाठी मिरची व सामानावर एकदा नजर फिरवून ते साफ आहेत ह्याची खात्री करावी. कचरा, कागदाचे कस्पट, सुतळीचा धागा, लहान दगड वैगरे असण्याची शक्यता असते.
२. मिरच्यांचे देठ पुर्ण काढू नये. वरची काडी अलगद कापावी वा तोडावी. तसेच मिरच्या पुर्ण सुकलेल्या असाव्यात. बाजारातून सुक्या मिरच्या आणल्या तरी मिरच्यांना एक दोन ऊन्हे दिलेली उत्तम. आणि थोड्या मोडून ठेवाव्या. तसेच हळकुंड ही फोडून ऊन द्यावे.
३. मसाला बनवताना, हिंग आणि राई सोडून मसाल्याचे पदार्थ एक एक करत हलकेच भाजून घ्या म्हणजे मसाला अधिक काळापर्यंत व्यवस्थित टिकतो आणि भाजल्यामुळे स्वादही अजून खुलतात. आवडत असल्यास तेलाचा हलका हात मसाल्यांना लावूनही भाजू शकता. अगदी दोन ते तीन मिनिटे न करपवता भाजून लगेच दुस-या भांड्यात काढा.
४. मसाल्यामधे राई अख्खी न टाकता, भाजून पावडर करून टाकणे कधीही उत्तम. राई खरपुस भाजावी. अआणि पावडर करावी.
५.सर्व मिरच्या एकत्र करा आणि भाजलेली राई सोडून इतर गरम मसाला जिन्नस दुस-या भांड्यात असे डंकावर किंवा चक्कीमधे दळून आणावे.
तुमचा वाडवळी मसाला तयार! :)
कशामधे वापरू शकता त्या पदार्थाची माहिती वरती दिलीच आहे.
लक्षात ठेवा:
• तिखटपणा वाढवायचा असल्यास शक्यतो मिरची, काळेमिरे किंवा दालचिनीचे प्रमाण वाढवून करावा, लवंगाचा झटका तीव्र व त्रासदायक वाटू शकतो.
• खसखस, तीळ, चणा ह्यांच्या वापराने मसाल्याचा रस्सा जाडसर होतो.
• मसाले बनवताना जिन्नस वाळवण्याचे कापड, हात व चमचे स्वच्छ व कोरडे असावेत. तसेच तयार मसाला वर्षभरासाठी साठवण्यासाठी भरताना काचेची बरणी, डब्बा, चिनीमातीचे भांडे किंवा टप्परवेअरचे डब्बे हे अगदी कोरडे आणि स्वच्छ असावे. ठेवण्याची जागाही वर्षभर कोरडी राहिल अशी असावी.
आठवडा किंवा दोन आठवडे पुरेल एवढा मसाला वेगळ्या लहान बरणीत ठेवावा. म्हणजे मुख्य भरणीला सतत उघडायला नको. लहान बरणीतला मसाला संपत आला कि अलगद कोरड्या हाताने व चमच्याने मसाला लहान बरणीत काढत जा.
• मसाले भरल्यावर त्यावर जास्त टिकावा आणि पोरकिडा/ पाखरू लागू नये म्हणून हिंगाचे खडे वरती टाकून ठेवावेत.
• तयार मसाला दळून आणल्यावर, भरून ठेवण्याआधी एक दोनदा जेवणात वापरून पहा. काही कमी जास्त वाटल्यास त्याप्रमाणे वरून पावडर करून घालून मिक्स करता येऊ शकते.
मसाल्याच्या सर्वच जिन्नसांबद्दल माहिती मिळवण्यासाठी खालील लेख नक्की वाचा. फोटोसहित माहिती दिली आहे.
https://www.facebook.com/666217570131149/posts/2981250945294455/
अजून मसाल्यांसोबत पुढच्या भागात भेटूया! :)
- Food Memories Marinated with Love ♥️ by, स्नेहा चौधरी- इंदूलकर
अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला 'Like' करा.
https://www.facebook.com/themasalabazaarstore/
आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.
#वाडवळ #वाडवळी_मसाला #vadvali_masala #vadaval #everydayusespiceblends #laxmi_masale #laxmimasaleedwan #themasalabazaar #spice_blends #loveforfood