top of page

कथा ...माझ्या अपहरणाची

मी तशी एक साधी मुलगी. आयुष्याकडून फार जास्त काही अपेक्षा नव्हत्या. हसरे प्रेमळ कुटुंब आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आई बाबा दोन बहिणी. आयुष्याचे समीकरण खूप सोप्पे होते. अपेक्षा फार काही नव्हत्याच. मम्मी 'पपा सारखे आनंदी हसून खेळून मजेत आयुष्य व्यतीत करायचे साधे स्वप्न होते. आपले लग्न होईल नवरा असेल मुले सासू सासरे असतील. त्यांची गोडी गुलाबीने सेवा करावी. छान छान पदार्थ बनवून खाऊ पिऊ करावे. फॅमिली पिकनिक कराव्यात. नवीन नवीन ठिकाणे पाहावीत आणि धमाल आयुष्य जगावे असे साधे स्वप्ने होती. घर ऑफिस घर संसार कुटुंब मित्र मैत्रिणी साधे सरळ नाकासमोर चालणारे आयुष्य असावे असे वाटायचे.पण माझया लहानपणी एक अशी घटना घडली होती जी आयुष्यभर माझ्या मनावर कोरली गेली.

मी लहान असताना म्हणजे फार फार तर चौथी पाचवीत असेन गावी गेलो होतो. दिवसभर शेतातून वाडीतून भटकायचे , मित्र मैत्रिणींसोबत मुक्तपणे खेळायचे , झाडावर चढून आंबे चिकू जाम्बु आवळे जांभळे करवंदे खजूर खायचे. खूप मजा असायची. त्या दिवशी सुट्टी संपवून आम्ही पुन्हा मुंबईला यायला निघणार होतो. म्हणून मी आजूबाजूच्या मावश्यांची मुले मुली आम्ही सर्व ७ / ८ जणे वाडीत गेलेलो हुंदडायला. पण इतक्यात आमचा रस्ताच चुकला. म्हणजे पाच दहा मिनिट्स मध्ये येणारी वाडी (फार्म) अर्धा तास झाला तरी येईचना आणि मग मला कळून चुकले कि आम्ही सर्व भलत्याच कुठल्या तरी रस्त्यावर आलोत. आजूबाजूला कोणीही नव्हते फक्त लांब लांब वाडी शेते दिसत होती. असेच अजून अर्धा तास चालल्यावर आम्हाला एक माणूस त्या निर्जन रस्त्यावर येताना दिसला. बाकी सर्व माझ्यापेक्षाही लहान होते त्यामुळे मीच त्या काका ना सांगितले कि आम्ही रस्ता चुकलोय आम्हाला आमच्या गावापर्यंत नेता का. त्याने हो म्हटले चला माझ्याबरोबर म्हणून आम्ही सर्व त्याच्यामागून गेलो. पण आमच्या दुर्भाग्याने तो माणूस एक मुले चोरणाऱ्या गॅंग चा माणूस होता आणि त्याने आम्हाला एका कुडाच्या झोपडीत आणून डांबून ठेवले.

आमच्या आधी तिथे अजून पाच सहा आदिवासी मुले हि डांबून ठेवलेली होती. ते एक आदिवासी लोकांचे असते तसे साधे कुडाचे झोपडे होते.आम्हाला तिथे डांबून दार लावून तो माणूस अजून दुसरी सावज शोधायला निघून गेला. बाहेर दारू पिऊन झिंगलेला एक माणूस होता पहारेकरी. मला सर्व भयंकर परिस्थितीची जाणीव झाली. आपण एका मोठ्या संकटात सापडलो आहोत आणि मम्मी 'पपा सर्व आम्हाला शोधत असणार याची मला कल्पना होती. आता यातून काहीतरी करून स्वतःला आणि इतर मुलांना सोडवलेच पाहिजे हे मनोमन पक्के केले. त्या लहान वयातही ...आज हि मला लक्ख आठवतेय मी संपूर्ण झोपडे तपासले. कुठे काही बाहेर पडायला मार्ग आहे का ते पहिले. पण सर्व दरवाजे बंद होते. खिडक्या बाहेरून लावलेल्या होत्या. पण माझ्या तीक्ष्ण नजरेने पाठीमागच्या भिंती ला असलेल्या छोट्याशा क्षिद्रातून येणारी सूर्याची किरणे पहिले आणि मी लगेच ठरवले कि इथे जर आम्ही बाहेर पडू इतपत हे भोक मोठे केले तर बाहेर पडता येईल .पुढचे पुढे बघू.

मी आजूबाजूला बघितले तर तिथे दारू ची एक फुटलेली बाटली होती. मी त्या बाटलीने हळू हळू त्या भोकाला तोडायला सुरुवात केली आवाज न करता. कुडाची भिंत असल्याने ते मजबूत नव्हती. हळू हळू ते भोक मोठे होत गेले. मी च सर्वात मोठी मुलगी असल्याने आधी स्वतःला कमरे इतपत निघत येते का ते पहिले आणि जेवा खात्री पटली कि मी स्वतः निघू शकते ठेवा आधी सर्व मुलांना हळूच शांत राहायला सांगितले. सर्व घाबरलेली होती त्यामुळे मोठी ताई सांगतेय ते सर्व ऐकत होते. मी सांगितले कि एक एक करून बाहेर पडा आणि जा वाट मिळेल तिथे धावत सुटा. माझ्या भावंडाना मी सांगितले कि हातात हात घालून एकत्र धावयचंय जिथे वाटेल तिथे. आणि आम्ही निघालो. सर्व मुले त्यात भोकातून पाळली. बाहेरचा दारू पिलेला माणूस झिंगलेलाच होता त्यामुळे त्याला शुद्ध नव्हती त्यामुळे देवाच्या कृपेने आम्ही बचावलो.

थोड्या वेळाने आम्ही मोठ्या रस्त्याला लागलो आणि धावतच होतो. कुठे जात होतो माहित नाही पण वीसेक मिनिटाने माझा मामे भाऊ मुन्ना दिसला. बैलगाडी चालवत तो शेतातून घरी परत जात होता. म्हणजे दुपार पासूनचे आम्ही संध्याकाळ झाली तरी बाहेर होतो. त्याने आम्हाला विचारले इकडे इतक्या लांब कसे सर्व जण आलात. बसा बैलगाडीत. आम्ही बसलो आणि मी सर्व सांगितले त्याला. तो पण घाबरला. मला म्हणाला आता कोणाला काय बोलू नकोस. मम्मी 'पपा जाम ओरडतील आणि तुम्हाला मुंबईला परत जायचंय. मी हो म्हटले. त्याने सुखरूप आम्हाला परत आणून सोडले.

त्या नंतर आम्ही कधीही एकटे दुकटे शेतात वाडीत गेलो नाहीत. आणि मी माझ्या घरातल्या आणि स्वताच्या मुलानांही एक मिनिट सुद्धा एकटे सोडत नाही कुठेही.

स्वतः ह्या अनुभवातून गेल्यामुळे आणि आताचे जग किती वाईट आहे हे पाहिल्यामुळे असेल पण कुठलाच चान्स मी घेत नाही.

मुन्ना नरपड चा माझा मामे भाऊ - आमचा त्राता. ह्यानेच आम्हाला सुखरूप आणले घरी ... त्याच्या हळदीच्या वेळचा हा फोटो

माझा गाव - नरपड ( डहाणू)

bottom of page