माझी वाटचाल...
मी भूमिका म्हात्रे ( पुर्वाश्रमी ची भूमिका ठाकूर ) . दहिसर गावठण ह्या मुंबई मधील शेवटचे टोक असलेल्या गावठण मधील एक छोटीशी मुलगी. वयाच्या २४ व्या वर्षी माझ्या कंपनीतून कामासाठी मला अमेरिकेला पाठवलं. आम्ही सगळे ठाकूर मंडळी खूप खवय्ये आणि भटकू. मुक्त भटकायला , इथे तिथे फिरायला , नवीन नवीन स्थळे पाहायला आम्हाला पहिल्यापासून आवड.
माझ्या मम्मी 'पपा नि लहानपणापासून आम्हाला संपूर्ण भारत फिरवलंय. दर उन्हाळी सुट्टी ला आम्ही कुठल्यातरी दुसऱ्या स्टेट मध्ये २० दिवस फिरायला जायचो. कधी महाराष्ट्र दर्शन, कधी राजस्थान, कधी केरळ, मद्रास, कधी गुजराथ असे कुठे ना कुठे तरी भटकंती असायचीच. त्यामुळेच आज आमच्याकडे खूप आठवणी आहेत. लहानपण खूप मजेत गेले.
त्यामुळे अमेरिकेला आल्यावर माझी खूप चंगळ होती. खूप भटकले मी. लॉस अँजेलिस शहरात म्हणजे चक्क हॉलिवूड च्या शहरात मी तब्बल २ वर्ष राहिले. फॅशन निसर्ग सौंदर्य यासाठी कॅलिफोर्निया जगप्रसिद्ध आहेच. त्यामुळे बरेच ठिकाणे फिरले मज्जा आली. त्यातील काही ठराविक ठळक आठवणी आणि ठिकाणे मी इथे माझया लेखांमध्ये मांडायचा प्रयत्न करत आहे. आशा आहे कि तुम्हाला वाचायला आवडेल...
मी पाहिल्यान्दा विमानात बसले तो दिवस आज हि मला आठवतोय. २ आठवडे माझी आणि घरच्यांची खूप धावपळ झालेली. व्हिसा आलेला होताच. पण अचानक तिकीट काढलाय आणि पुढल्या आठवड्यात निघायचंय असे जेव्हा कळले तेव्हा खूपच घाई झाली. शॉपिंग , सर्वाना भेटायचे होते, निघण्यापूर्वी मोठ्यांचे आशीर्वाद घेणे , बॅग्स भरणे , सर्व कागदपत्रे गोळा करणे ह्यामुळे आम्ही सर्वच दमलो होतो. मग तो दिवस आला. मी एअरपोर्ट वर सर्वाना टाटा बाय बाय करून गळाभेटी घेऊन खूप आनंदात विमानात येऊन बसले. माझे एक स्वप्न पूर्ण होत होते. लहानपणी पाहिलेले ...विमानात बसायचे .
खूप छान वाटत होते. मग विमान सुरु झाले छान खाऊ पिऊ झाले आणि माझया आजूबाजूचे सर्व जण झोपी गेले. मला झोप येण्याचा प्रश्नच नव्हता कारण विमानातून खाली बाहेर पाहायचे होते कि कसे दिसते सर्व. ते मी पहिले काही तास. मन भरून बघून झाल्यावर मग मी हि डोळे बंद करून बसले. हळूहळू माझ्या आता पर्यंत च्या आयुष्याचा सर्व चित्रपट माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. मम्मी 'पपा चे कष्ट , माझे शिक्षण, माझी नोकरी , मम्मी 'पपा साठी माझया घरासाठी फॅमिली साठी काहीतरी करायची जिद्द , त्यासाठी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीला कष्टाला फळ म्हणून ज्या क्लायंट साठी काम केलेले त्यांनी इतक्या कमी वेळात मला लगेच अमेरिकेला बोलावून घेतलेलं हे सर्व मला एखाद्या स्वप्नासारखे भासत होते.
शेवटी मला अचानक माझी फॅमिली डोळ्या समोर आली. मम्मी 'पपा माझया दोन बहिणी अश्विनी आणि दुर्गा. त्यांची आठवण आल्यावर एकदम जाणवले अरे बापरे ! आता त्यांना रोज भेटता बघता येणार नाही. एखाद दोन वर्ष लांब राहावे लागणार होते कामामुळे. आणि माझा सर्व धीरच खचला. मायेच्या माणसापासून दूर जाणे हि वेदनाच किती खूप भयानक असते ह्याचीही जाणीव झाली. आणि माझे डोळे भरून आले. कंठ दाटून आला. माझ्याही नकळत माझया डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जोरजोरात हुंदके देऊन रडावेसे वाटत होते पण मूक आक्रोश सुरु होता. माझया बाजूलाच एक वयस्कर गृहस्थ बसलेले. ते बेंगलोर वरून लॉस अँजेलिस ला कामासाठी जात होते. त्यांना माझी अवस्था कळली. कि एक लहान शी नुकतीच १ / २ वर्ष झाली असतील कॉलेज मधून बाहेर पडून अशी हि लहानखुरी मुलगी एकटीच विमानातून जातेय... आणि रडतेय... त्यांना माझे मन कसे कळले माहित नाही. पण त्यांनीही मला आधी खूप मन भरून रडून दिले. मग मला हलवून जागे केले आणि माझ्याशी कधी हिंदी आणि कधी इंग्लिश मध्ये बोलयला सुरुवात केली. माझी मनस्थिती समजून घेतल्यावर त्यांनी मला खूप छान समजावले. ते हि ह्या फेज मधून गेलेले आहेत. पण जीवन जगायचे समजून घयायचे मोठे व्हायचे तर हे सर्व आघात झेललेच पाहिजेत. ह्यातूनच कसे स्ट्रॉंग कणखर व्हायचे हे त्यांनी मला खूप छान समजावले. आम्ही बहुधा ४ तास बोलत होतो. ते ४ तास मला खूप काही शिकवून गेले.
मग माझे विमान जर्मनी च्या फ्रँकफर्ट विमानतळावर उतरले. तिथे काही तास विश्रांती नंतर आम्ही सर्व जण लॉस अँजेलिस ला पोहचलो. ७ मे ला मी अमेरिकेच्या धर्तीवर पाऊल ठेवले. माझा ऑफीस मित्र निल गाडी घेऊन मला घ्यायला आला होता. माझ्या कंपनीने २ आठवडे माझ्यासाठी हॉटेल बुक केलेलं होते. खूप सुंदर अशा माझ्या हॉटेल रूम मध्ये आल्यावर मला तर अगदी आकाश ठेंगणे झाले होते. थोडासा गर्व हि . आपल्या मेहनती वर इथवर स्वप्नवत वाटणाऱ्या ह्या आयुष्याबद्दल मला अभिमान वाटत होता. त्यासाठी मी माझ्या देवाचे आणि मझे सद्गुरू अनिरुद्ध बापू ह्यांचे मनोमन खूप आभार मानत होते. थोडेसे फ्रेश होऊन मग आम्ही बाहेर जेवायला आणि फिरायला गेलो. अप्रतिम मेक्सिकन स्पायसी फूड आणि कॅलिफोर्निया चे निसर्ग सौंदर्य , हॉलिवूड , सॅन्टा मोनिका, मालिबु बीचेस , समुद्रकिनारे खूप सुंदर आहे सगळे. एक दिवस आराम करून मग सोमवार पासून कामाला सुरुवात झाली.
खूप छान काम होते नवीन शिकायला मिळत होते. माझे वरिष्ठ अतिशय समजूतदार होते आणि त्यांच्याकडून रोज त्यांच्या बरोबर जेवताना , काम करताना त्यांचे अनुभव ऐकताना मी स्वतः खूप शिकले. आयुष्याबद्दल नवीन दृष्टी मिळाली. एक प्रगल्भ पणा आला. सुरुवातीला मी माझ्याच ऑफीसातल्या एका मुली बरोबर रूम शेअर करून राहत होते. भाडे, बिले आम्ही शेअर करायचो. जेवणाचे स्वतःचे स्वतः. कारण ती शाकाहारी होती आणि मी पक्की मासेखाऊ. त्यामुळे. एक वर्षाने मग मी ठरवले कि आयुष्यात सर्वच करून पाहायचे. काहीतरी नवीन. मग मी एका अर्जेण्टिना च्या कुटुंब बरोबर त्यांच्या प्रशस्त ५००० स्क्वे. फीट घरात भाडेकरू म्हणून राहू लागले.
तिथेच मला माझ्या खास मैत्रिणी मार्गारिटा , टिफनी भेटल्या. २ महिने त्या कुटुंब बरोबर काढले ते मला खूप नवीन अनुभव देऊन गेले. त्या कुटुंबातले आजी आजोबा , आई बाबा , मुले सर्वच खूप खेळकर हसमुख आणि प्रेमळ होती. २ महिन्यांनी मग मार्गा, टिफणी आणि मी आम्ही ठरवले कि स्वतःचे घर हवे. आम्ही तिघीही कमावत्या होतो. मार्गा वकील आहे. टिफणी हॉलीवूड मध्ये म्युझिक करत होती आणि मी आय टी कंपनीत कामाला होते. म्हणून मग आम्ही स्वतःचे भाड्याने घर घेतले. एक घर. टाऊनहाऊस. खाली मी आणि वर त्या दोघी अशा तिघींचे ३ विश्व त्या आमच्या छोट्या घरात वसवले होते. खूप धमाल केली खूप मज्जा केली. मार्गारिटा हि मेक्सिको ची होती. त्यामुळे त्यांची संस्कृती, त्यांचे जेवण, त्यांचे सॅन समजून घेता आले. टिफणी ऍफ्रोअमेरिकन होती, त्यामुळे तिच्या संस्कृती विषयो समजले . सहभाग घेता आला. त्यांना आपल्या संस्कृतीशी मी ओळख करून दिली. भारतीय घरगुती जेवण , वरणभात, मासे कालवण , चिकण मटण, भाकरी चपात्या ह्या सर्वांची त्यांनाही चटक लागली. २ वर्ष सहज निघून गेली.
ह्या दरम्यान माझे पती मयूर माझ्या आयुष्यात आले आणि आम्ही भारतात येऊन विवाहबद्ध झालो. परंतु ते न्यू यॉर्क ला राहत होते आणि मी होते कॅलिफोर्निया ला. त्यामुळे मी नवीन नोकरी शोधली आणि न्यू यॉर्क ला त्यांच्याबरोबर स्थायिक झाले. परत नवीन आयुष्य नवीन सुरुवात. सर्वच पहिल्यापासून सुरुवात करावे लागले. घरातली भांडी पासून ते फर्निचर सर्व नवीन विकत आणून नवीन संसार थाटला.