देवत्व आणि आत्मजागृती --
देवत्व आणि आत्मजागृती -- वेदान्तांची शिकवण (स्वामि विवेकानंद) -- मराठी शब्दांकन: हेमंत ग. भायदे.
वेदांत शास्त्र हे खुपखुप जुनं आहे. या शास्त्राचं ज्ञान आणि संशोधन पाच हजार वर्षापुर्वी भारतांतील ऋषीमुनीनी अवगत केलं आणि आचरणात आणलं. वेदांत म्हणजे मानवनिर्मित धर्मग्रंथ किव्हा काल्पनिक लिखाण नाही, तर हे अनेक काळ पृथ्वीवर असलेल्या मानवाच्या अस्तित्वाचं शास्त्र आहे. जसं गुरुत्वाकर्षण आणि ग्रहांचं आस्तित्व त्याचा शोध होण्यापुर्वी होतं तसंच वेदांतांचं अस्तित्व या शास्त्राचा शोध होण्यापुर्वीच होतं. वेदांत म्हणजे आपल्या भारतांतील ऋषी मुनींनी निरनिराळ्या वेळी संग्रहित केलेली अध्यात्मिक ज्ञानाची संपत्ती आहे. वेदांत म्हणजे हिंदु विद्वानांच्या अलौकिक अनुभवांचा आणि सुज्ञपणाचा उच्च थराला पोहोचलेल्या ज्ञानाचा संग्रह आहे. वेदांत म्हणजे हि केवळ हिंदु धर्माची शिकवण नाही तर ते एक मानवांतील देवत्वाची शिकवण देणारं आणि सर्व धर्माना एकत्रित करणारं सर्वव्यापी सत्य आहे.
वेदान्ताच्या शिकवणीप्रमाणे सर्व माणसांमध्ये देवत्व असतं आणि त्याच्या अवतीभोवती असणारं विश्व किव्हा वातावरण आणि घडणाऱ्या घटना हे त्याच्या देवत्वाच्या जागृतीमुळे घडलेली सत्यस्थिती असते. मानवी जीवनात सर्व शक्तिमान आणि जीवनाला संपृती देणाऱ्या योग्य घटना या त्याच्यामधील देवत्वामुळे निर्माण होतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वरी अमर्याद शक्ती, ज्ञान वास्तव्य, आणि शाश्वत सुख हे जन्मतः अंकुरित असतं. दोन व्यक्तींतील फरक हा केवळ त्यांच्या आपल्यामधील देवत्त्व जागृत करण्याचे प्रयत्न आणि जाणिव यामुळे घडला जातो. वेदांत आपल्याला आत्म्याच्या अस्तित्वाची शिकवण देतं. वेदान्ताच्या शिकवणीप्रमाणे मनुष्य कधीच जन्माला येत नाही किव्हा मृत्यु पावत नाही किव्हा स्वर्गवासी अथवा नरकवासी होत नाही. आत्म्याच्या अस्तित्वाचा विचार केला तर पुनर्जन्म म्हणजे केवळ काल्पनिक आहे. पुनःर्जन्म म्हणजे निसर्गाची उत्क्रांती आणि आपल्यामधील वास्तव्य करीत असलेल्या ईश्वराचं प्रकटीकरण आहे. स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव याला "निर्वाण स्थिती" म्हणतात.
वेदान्तांत म्हटलं आहे कि कोणत्याही व्यक्तीला "निर्वाण स्थिती" अनुभवाला येऊ शकते. ज्यांना निर्वाण स्थिती प्राप्त होते त्यांच्यावर त्यांच्या आजुबाजुला घडणाऱ्या घटनांचे काहीच परिणाम होत नाहीत. जेव्हा या आत्म्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते तेव्हा आपल्यामधील देवत्वाचा मार्ग मोकळा होतो आणि आपल्यांत नैसर्गिक सत्यतेचा प्रवाह वाहु लागतो. या प्रवाहांत आपल्याला कधीच दृश्य न झालेलं दृश्य होतं आणि अशक्य वाटणारं शक्य होऊ लागतं. आपल्या अज्ञानाने आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या मायावी जगांत गुंतुन जाऊन या अंतर्यामी ईश्वरशक्तीपासुन आपण दूर गेलो कि या देवत्वाच्या मार्गामध्ये अडथळे येऊ लागतात. जेव्हा आपण या अंतर्मय दैविक मार्गाला प्राधान्य देतो तेव्हा बाहेरच्या जगांतील सर्व घडामोडीं आपल्याला सहज हाताळता येतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
परमेश्वर म्हणजे काय ?
सर्वसाधारण माणसाची कल्पना अशी असते की परमेश्वर म्हणजे स्वर्गात रहाणारा एक श्रेष्ठ पुरुष की जो जगाचे सर्व व्यवहार संभाळतो आणि तो अशा काल्पनिक परमेश्वराची प्रार्थना करतो. या मार्गाने त्याचा भक्तीभाव वाढतो पण परमेश्वराशी प्रत्यक्ष संपर्क साधायचा मार्ग हा नाही. परमेश्वराशी प्रत्यक्ष संपर्क साधायचा मार्ग म्हणजे आपलं मन आपल्या आत्म्याशी केंद्रीत करणे. अशा प्रकारे एखाद्याचं मन या आत्मिक आनंददायी शांततेने व्यापित झालं की त्याला ईश्वरी शक्तीचा अनुभव येतो आणि त्याला परमेश्वराशी प्रत्यक्ष संपर्क साधता येतो. या मार्गाने त्याला भावनाप्रधान आणि उच्च विचारांना प्रवृत्त करणाऱ्या शक्तीचा अनुभव येतो आणि नेहमीच आनंदी वृत्ती राहिल्यामुळे त्याला सर्व सुखाचा लाभ होतो. परमेश्वराच्या संपर्काने त्याचं शरीर आणि मन अध्यात्मिक होऊन ईश्वरी शक्तीचा अनुभव त्याला नियमित येतो. परमेश्वराच्या भक्तिरूपी नशेत त्याचं जीवन प्रज्वलित होत. या प्रकारे परमेश्वराशी साधलेला संपर्क हा सर्वात उच्च प्रकारचा असतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
दैनंदिन जीवनांत आनंदी होण्याचा मंत्र. लेखक: हेमंत भायदे
या जगांतील सर्व यातनेंच मूळ कारण म्हणजे आपल्याला एखाद्या विषयी तीव्र इच्छा असणे आणि आपलं जीवन कसं असावं याविषयी असणाऱ्या आपल्या अपेक्षा. या इच्छा आणि अपेक्षा यामध्येच आपले विचार आणि कृती गुंतून राहतात आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या विचारांच्या लाटा आपल्यलाला क्षणिक आनंद आणि दुःख हे जाणवून देतात. माणसाच्या मनांतील नियमित विचारांची पातळी म्हणजे उच्च स्थानापासून ते नीच स्थानाकडे हेलकावणाऱ्या समुद्राच्या लाटांसारखी आहे. विचारांच्या या लाटांतून निर्माण होणारी शक्ती आपल्या मनांत सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने निर्माण करते. हीच मानसिक स्पंदने आपल्याभोवती आनंद आणि दुःखाची वलये निर्माण करतात. जेव्हा हि मानसिक अस्थिरता एका उच्च अध्यात्मिक पातळीवर स्थिर होते तेव्हा त्या व्यक्तीला एका अद्भुत सत्याची जाणीव होते आणि त्याची मनस्थिती मायावी जगाच्या विचारसरणीपासून दूर नेणाऱ्या एका वेगळ्या विचारशक्तीकडे पोहोचते. यालाच सुखद मनस्थिती म्हणतात. अशा व्यक्तींना विश्वाच्या घडणीविषयी उच्च जाणिवता येते आणि हि व्यक्ती विश्वाच्या एका वेगळ्याच स्पंदनांत वावरू लागते. हि एक अशी आत्मिक आनंद आणि मानसिक शांततेची उच्च स्थिती असते कि ज्यामध्ये यातना आणि तीव्र इच्छा यापासून आपलं मन भ्रमित होऊ शकत नाही.
अंधारी विचारांपासून प्रकाशमय विचारी जीवनाकडे नेवून आपल्या सर्व व्यथा दूर करणारा मार्ग म्हणजे या विश्वांतील आपण आपलं नैसर्गिक विश्वाशी असलेलं नातं जाणून घेणं आणि आपल्या नाशवंत शरीराचे अस्तित्व मानणे. आपण आपली विचार करण्याची प्रवृत्ती आणि वर्तन अशा दिशेने बदल करणं आवश्यक आहे कि ते फक्त वैयक्तीक इच्छा पूर्ण करण्यामध्ये गुंतलेल्या विचारांच्या तांब्यापासून दूर जाणारे असावे. योग्य विचारसरणीवरील विश्वास यामध्ये एक प्रचंड जीवनशक्ती असते आणि हीच जीवनशक्ती आपल्याला आत्मिक आनंद आणि मानसिक शांततेच्या उच्च पातळीला पोहोचवू शकते.
नेहमीच आनंदमय आणि प्रसन्न जीवन आपल्या आवाक्यांत आहे पण प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. आपण ज्या विचारांच्या जाळ्यांनी आपलं मन व्यापित ठेवतो त्याप्रमाणे आपलया मानसिक स्थितीचे रोपण आपल्या मनांत तयार होते. आत्मिक आनंद आणि मानसिक शांतता प्राप्त करण्यामधील आपलं यश हे विश्वास, कृतज्ञता, समजूतदारपणा, निर्धार आणि शांत विचार यावर अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे अशी मनस्थिती प्राप्त करण्यासाठी सुज्ञपणा, नैतिक आचरण, आणि मानसिक शिस्त असणं आवश्यक आहे. जीवन म्हणजे समतोलपणा. आपलं आयुष्य समतोल असण्यासाठी आपल्याला आपला देहभाव, आपलं व्यक्तिमत्व, आपलं शरीर, आपलं मन आणि आपली विवेकबुद्धी समतोल करणे आवश्यक आहे. अशी समतोलता प्राप्त करून उच्च मनःस्थितीचा अनुभव मिळविण्यासाठी काही मार्ग खालीलप्रमाणे आहेत.
• नियमित साधना करणे आणि उच्च शक्तींना (जीवनशक्ती) शरण जाणे. • आपले विचार आणि कृती इतरांना आनंदी आणि उच्च स्थितीला आणणारे असणे. • गरीब आणि गरजूना मदत करणे आणि मानवतेचं कार्य करणे. • ज्या विचारांपासून आपलं मन त्रासित होत असेल अशा विचारांपासून दूर राहणे. • आपल्या विचारांची किव्हा कल्पनांची सक्ती इतरांवर न करणे. • नेहमीच सत्य बोलणे आणि विचार व कृतींमध्ये सत्याचे आचरण असणे. • आपल्याच समस्याना प्राधान्य देऊन नेहमीच तक्रारी सुर मांडण्यापासून दूर राहणे. • अनावश्यक विचारद्वंद, चर्चा आणि वादविवाद टाळणे. • त्रस्थ मनस्थिती करणाऱ्या दैनंदिन भौक्तिक घटनांपासून दूर राहणे. • प्रेम, क्षमाशीलता आणि अनुकंपा यावर जास्त केंद्रित होणे. • एकत्रितपणा आणि विनयशीलपणा या वृत्तीची जोपासना करणे. • जीवनाचा योग्य हेतू काय आहे हे समजून घेणे.
वरील दिलेले विचार आणि कृतीं जास्तीत जास्त आचरणांत आणा. आपल्याला मानसिक शांती आणि प्रेम हे ताबडतोब अनुभवास येतील. आपण नेहमीच वर्तमान काळांत केंद्रित व्हाल. भूतकाळ आणि भविष्यकाळ वास्तव्यामध्ये विलीन होऊन आपली मनःस्थिती नेहमीच काळजींमुक्त होईल. कदाचित हि अशी आनंदी आणि काळजीमुक्त मनःस्थिती कायम राहील का याविषयी आपले मन भ्रमित होऊ शकेल. पण हे लक्षांत ठेवणं महत्वाचं आहे कि, आपल्या मनस्थितीचे शिल्पकार आपणंच आहोत आणि अशी उच्च मानसिक स्थिती तयार करणे आणि जोपासणे हे आपल्याच हातात आहे.
लेखक: हेमंत भायदे
आपल्याला हा लेख आवडला तर लेखकाच्या नावासहित फेसबुकवर जरूर शेअर करा. कृपया कॉपी/पेस्ट करून इतर माध्यमांत अथवा आपल्या नावावर हा लेख पोस्ट करू नका. धन्यवाद.
Hemant Bhayde
February 27 at 12:20am