अही माही वाडवळी बोली
हा लेख लोकसत्ता रविवार दि. ९ जून २०१३ रोजी "अही माही वाडवळी बोली" या शिर्षकाखाली प्रसिध्द झाला होता. लेखक श्रीकांत राऊत आहेत. माहितीसाठी कळवित आहे . लेख उत्तम व माहितीपूर्ण आहे यांत शंका नाही.
I got below excellent article from Sachin Patil. I am publishing it on our website under cultural khajina.
Message Details:
नाव Name Sachin vasudeo patil,from Betegaon. Thanks.
वाडवळी ही मराठीतली एक बोली ठाणे जिल्ह्य़ातील सागरीकिनाऱ्यावरील प्रदेशात बोलली जाते. वाडवळीतील अनेक शब्द ज्ञानेश्वरी व एकनाथी वाङ्मयात आढळतात. या बोलीत लोकसाहित्याचा मौलिक ठेवा आहे. वाडवळी लोकगीतांमधून लोकजीवनाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. मौखिक परंपरेमुळे ही लोकगीतं अजूनही टिकून आहेत. वाडवळी लोकगीतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जातात. या लोकगीतांचा स्वर नैसर्गिक, सरळ आणि भोळेभाबडा आहे. त्यात अनुभूती आणि संवेदनशीलता जाणवते. काही वाडवळी गीतं ऐकताना तर डोळ्यांत पाणी येतं. ओटीत केळ केळवकरणी माथ्यात मर्वा माहीमकरणी झळ्ळक मोत्यांच्या अल्लाळकरणी टिकीला टोणी नि झल्यापल्याच्या चिंचणकरणी..
उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्य़ात सागरी किनाऱ्यालगतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. या भागात सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमंवशी क्षत्रिय समाजास शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे नामाभिधान पडले आहे. या समाजाच्या बोलीभाषेस ‘वाडवळी’ असे संबोधले जाते. तिचा उगम आणि विकास बहुतांशी ठाणे जिल्ह्य़ातच झालेला दिसतो. ही बोली वसई परिसरात बोलली जाते. कुठल्याही बोलीभाषेची जडणघडण निसर्गावर अवलंबून असते. समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागातले लोक सहज आणि मोकळ्या आवाजात बोलतात. डोंगरदऱ्यातील लोक मोठय़ा आवाजात जणू काही समोरील माणूस बहिरा आहे अशा प्रकारे बोलतात.
वाडवळीचे मूळ शोधताना ऐतिहासिक पुराव्यांचा मागोवा घ्यावा लागतो. ही बोली बोलणारे ठाणे जिल्ह्य़ातील सोमवंशीय कुळाचे मूळ शोधताना ‘महिकावतीची बखर’, ‘बिंबाख्यान’, ‘साष्टीची बखर’ आदी ग्रंथांतून माहिती मिळते. चंपानेरच्या प्रतापबिंबाने उत्तर कोकण जिंकल्यावर शके १०६० च्या सुमारास पैठणहून जी ६६ कुळे कोकणात आणली, त्यात सोमवंशी क्षत्रिय समाजाची २७ कुळे होती. त्यावेळी बिंबराजाने हा उत्तर कोकणचा प्रदेश जिंकून महिकावती (माहीम) येथे आपली राजधानी वसवली. बिंबराजा व त्याच्याबरोबर आलेल्या क्षत्रिय कुळांची जात पाठारे होती. महिकावतीच्या बखरीत पुढील मजकूर आहे- ‘श्रीगणेशाय नम: स्वस्ति श्रीनृपविक्रमार्कसमयांति संवत ५७४ माहे फाल्गुन शुद्ध ९ रविवार ते वर्तमानिमाहाराज राजाधिराज सिंहासनमंडित सिंहीसंग्रामातील अरीरायविभांड श्रीसवितावंशभुपति पाठाराज्ञाति संमधि मुळपुरुष रामराजा।।’
वाडवळीत मराठीतील लिंग, वचन, काल हा भेद पाळला जात नाही. म्हणजे या बोलीला व्याकरण नाही, पण तीत अतीव जिव्हाळा आहे. आपुलकी आहे. जवळीक आहे. मराठीतली ‘स’ व ‘श’ या दोन अक्षरांऐवजी वाडवळीत ‘ह’ हे एकच अक्षर वापरले जाते आणि ‘च’चे रूपांतर ‘स’मध्ये होते. जसे- ‘चणे’ऐवजी ‘सणे’ म्हटले जाते. ‘समई’ऐवजी ‘हमई’ व ‘शेण’ऐवजी ‘हेण’ म्हटले जाते.
ठाणे जिल्हा गुजरातच्या सीमेवर असल्याकारणाने काही गुजराती शब्दांचा वापरही तीत सहजगत्या केला जातो. उदा. घणा (पुष्कळ), कादव (चिखल), बिजा (दुसरा), इत्यादी. वाडवळी बोलीचा एक परिच्छेद पाहू.. ‘‘दामुतात्या मुंबयसन रेल्वेगाडीन पालघर येव्या निंगाले. एक सरदारजी पोतं घेवून त्याह्य़ास डब्यांत सढला. पालघर स्टेशन आल तव सरदारजीही नीज काय पूरी नोती जाली. कहाबहा उतावळा होवून डेवला व त्याह पोतं डब्यातस विहरला. दामुतात्या बोंबलून हांगते, ‘सरदारजी तुमका पोता रह गया.’ सरदारजी हांगते, ‘पोता? किसका पोता? मेरी तो शादी नही हुई. ये पोता कहा से पैदा हुआ?’ दामुतात्या बुसकाळ्यात पडला. पोत्याहा नं लगिनाहा संमंद कहा जोडते यो सरदारजी? माईमसा दत्तु ते जादास बुसकाळ्यांत पडला न दामुतात्याला हांगते, ‘घे सल पोतेस (सोतास) गोण विहरते न बिज्यांना वेडय़ात काडते.’’
वाडवळी मराठीची बोलीभाषा आहे. वाडवळीमधील अनेक शब्द ज्ञानेश्वरीत व एकनाथी वाङ्मयात आहेत. वाडवळीत लोकसाहित्याचा मौलिक ठेवा आहे. या लोकगीतांमधून समाजाच्या लोकाविष्काराचे व लोकजीवनाचे प्रतिबिंब उमटलेले आहे. मौखिक परंपरेमुळे ही लोकगीतं अजून टिकून आहेत. लोकगीतं ही निसर्गत: मिळालेली देणगी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील भावनांचा आविष्कार व्यक्त करण्यासाठी गीतं आणि संगीत हे एक माध्यम असते. त्यातून भावनांचा सहजसुंदर आविष्कार व्यक्त होतो. शब्द, भाव आणि स्वर या गोष्टी आपोआप जुळत जातात. त्यामुळे ते उत्स्फूर्तच असतं. त्यातूनच लोकगीतं जन्माला येतात.
वाडवळी लोकगीतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आली आहेत. या लोकगीतांतील स्वर नैसर्गिक, सरळ आणि भोळेभाबडे आहेत. त्यात अनुभूती आणि संवेदनशीलता आढळते. काही गीतं ऐकताना तर डोळ्यांत पाणी येतं. उत्तर कोकणातील सागरी किनाऱ्यावरील बहुतेक वाडवळी लोकगीतं स्त्रीमुखातून आलेली आहेत. ही स्त्री शेती व वाडीत काम करणारी कष्टाळू, सोशिक वाडवळी स्त्री आहे. बाजारात जाऊन भाजीपाल्याची, केळीच्या लोंगराची ‘विक्रा’ करणारी आहे. त्या विक्रीमधून ती पैसे जमवून शिल्लक पैसा गाठीशी ठेवते त्याला ‘बारोजा’ म्हणतात.
या भागात लग्नसमारंभ हा राज्यारोहण सोहळ्यासारखाच मानला जातो. वर हा राजा असतो. त्याला ‘वराजा’ असे म्हणतात. उत्तर कोकणातील वाडवळ जमातीतील वराजा सिंहासनातून मिरवला जातो. बिंबराजाच्या बरोबर जी क्षत्रिय कुळे आली, त्यांना जे अधिकार, मानचिन्हे दिली गेली, त्यावेळी हा मान या जातीला मिळाला. ही सिंहासने मूळ चंदनी लाकडाची होती.
वाडवळीतील हळदीचे एक लोकगीत पाहण्यासारखे आहे- हंकारीले तारू देव गेले शापुरा (शहापुरा) हंकारीले तारू देव गेले शापुरा देव गेले शापुरा कोऱ्या हळदीला आणिल्या हळदी उतरविल्या भाणोसी गाईच्या गायमुत्री हळदी वाफियेल्या सूर्याच्या किरणी हळदी वाळविल्या हळदी वाटीता हात झाले सुरेख हात झाले सुरेख पाय झाले भिवंक एऊढा उरेक कोऱ्या हळदीला होळीच्या सणाला उत्तर कोकणात फारच महत्त्व आहे. होळीची लाकडे मागण्यासाठी जाताना पुढील गाणे गातात- होळी रे होळी पुरणाही पोळी घ्या घ्या कुराडी सला जाऊ डोंगरी डोंगरीह्य़ा पल्याड सावळ्या तुहा वाडारे कापीले संदन बांधीले भारे नेऊन टाकले पाटलाह्य़ा दारात रे पाटलाहा पूत मेला हुताराह्य़ा दारात रे होळीवर आले होळकर कुडी (फाटी) द्या रोपवाडीकर आय नाय का बाय नाय घेतल्याशिवाय जाय नाय..
वाडवळ जमातीत पूर्वी वार, तिथी, महिना या संदर्भाला अनुसरून नावे ठेवली जात असत. उदा. रविवार- (ऐतवार) ऐतवाऱ्या, रवि, ऐतवारी (स्त्रीलिंगी); सोमवार- सोमाऱ्या, सोमा, सोमारी- सोमी (स्त्रीलिंगी); मंगळवार- मंगळ्या, मंगळू, मंगळी (स्त्रीलिंगी); बुधवार- बुधवाऱ्या, बुध्या, बुधू, बुधवारी, बुधी (स्त्रीलिंगी); गुरुवार- (बिस्तीरवार) बिस्तीऱ्या, बिस्तीरवाऱ्या, बिस्तीरी (स्त्रीलिंगी); शुक्रवार- सुकऱ्या, शुक्रवाऱ्या, सुकरी, शुक्रवारी, सुक्री, सुकी (स्त्रीलिंगी); शनिवार- हिणवार, हिणवाऱ्या, हिमणी, हिणवारी, हिमी (स्त्रीलिंगी). वाडवळीत चैत्राला ‘सैत’, ज्येष्ठाला ‘ज्येष्ठ’, मार्गशीर्षला ‘मागेसर’, ‘महगीर’, आषाढाला ‘आखाड’, पौषाला ‘पूस’, ‘पुहू’, श्रावणाला ‘सरावण’, भाद्रपदाला ‘भादवा’, फाल्गुनाला ‘शिमगा’ असे म्हणतात.
या बोलीतील म्हणी व वाक्यप्रचारही वैशिष्टय़पूर्ण आहेत. उदा. सिसा विकता जनम गेला न् वाकडय़ा फळाह नाव काय? (माहिती असूनही अज्ञान दर्शवणे), खिशात नय आणा, पण बाजीराव म्हणा! (आर्थिक बाब कमकुवत असताना मोठेपणा मिरवणे), पाण्यात भडका मारला ते पाणी का दूर होथे? (मुलाबाळांत थोडं भांडण झालं तरी ती जवळ येणारच), बोटभर काकडी न् हातभर बी! (एखाद्या वस्तूचा बडेजाव करणे), हाय खांद्यावर न् पावते बंदावर? (काखेत कळसा न् गावाला वळसा), हांगव्या गेला ते टांगव्या निंगाला?, भीक ते भीक कराटी रंगीत, मुंबय मावली, पण खिशात नय पावली. असेच शब्दांचेही आहे. या बोलीत अनेक स्वतंत्र शब्द आहेत. उदा. अणवारी (नवरीसोबत गेलेली तिची सखी), अस्तमान (संध्याकाळ), अटे (इकडे), तटे (तिकडे), अवडा (एवढा), असणी बोठी (एवढी मोठी), आटी (उचकी), इंगळ (विस्तव), उंतर (उंबरठा), गोवारी (गुराखी), बणेबणे (उगीच उगीच, गंमत म्हणून खोटे खोटे), पाडोळ्या (भटक्या), इत्यादी.
अही हाय माही वाडवळी बोली आज अहेल ती अबोली ती हाय माही माय मावली मी तिहा वाहरू तिला मी कहा विहरू? (वाहरू- वासरू, विहरू- विसरू) सुशिक्षित समाजबांधवांनी आपल्या मुलांना मराठीतून बोलण्याची सवय लावल्याने व नोकरीधंद्यानिमित्त शहराकडे स्थलांतर केल्याने नवीन पिढी आता वाडवळी बोलू शकत नाही. त्यामुळे ही बोली बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
दूरध्वनी क्रमांक Phone 9960713957 ई मेल Email Sachin.1978@rediffmail.com Sent on: 3 January, 2017 Thank you Sachin! Do let us know such amazing articles etc always.