top of page

आमचा वाडवळ सांस्कृतिक खाना खजिना Our traditional Vaadval Recipies

तर मंडळी आम्ही डहाणू कडील नरपड निवासी. आम्ही पक्के मासे खाऊ मटण चिकन- पक्के मांसाहारी . माह्या वाडवळ भाषेत हांगाव्या तर मच्छी मटण कोंबडी/पिलोटे सब्बन खातो.

माझ्या लहानपणी पासून माझ्या आई बाबा नी आणि सर्व नातलगांनी आम्हाला भरपूर खाऊ पिऊ घातलाय. आमच्याकडे सर्व पदार्थ ताजे बनतात.

आजकाल बर्याच घरा मध्ये आपण बघतो कि स्त्री किंवा पुरुष वेळ नाही / खूप थकलोय / शक्तीच नाही उरत दमल्यावर ह्या सबबीखाली दोन तीन दिवसाचे आगाऊ जेवण बनवून ठेवतात. इथे बाहेरगावी तर मी काही लोकांना एक एक आठवड्याचे देखील जेवण एकदम बनवून फ्रीझ मध्ये ठेवतात असे बघितलेले आहे. ह्या सर्व चुकीच्या पद्धती आहेत. कारण आहार शास्त्र प्रमाणे अन्न हे ताजे गरम असताना सेवन करावे. त्याने अन्नाचे सर्व पोषक तत्व तर मिळतातच पण समाधान देखील मिळते.

तर माझे 'पपा "बंडू" ह्या नावाने नरपड ला प्रसिद्ध होते. (आजही ते आमच्यात नसले तरी लोक त्यांची आठवण काढत आहेत) तर 'पपा माझे खूप छान शेफ होते. इतके पदार्थ बनवायचे कि आम्हाला कधी बाहेर कुठे जायची गरजच भासली नाही. वाडवळ तसेच देश विदेशाचे पदार्थ त्यांनी शिकून करून बघितले आणि आम्हाला खाऊ घातले.

माझी आई प्रिया ठाकूर हि "लता" ह्या नावाने प्रसिद्ध आहे. खूपच उत्साही आणि सदाबहार असा तिच्या स्वभावाने ती सर्वांची खूपच आवडीची आहे. तर अशा अत्यंत हौशी दाम्पत्यांच्या घरात माझा जन्म झाला हे माझे भाग्यच.

आम्ही तिघी बहिणी मी मोठी भूमिका ठाकूर (लग्न नंतर भूमिका मयूर म्हात्रे), मग अश्विनी ठाकूर (लग्न नंतर रिया राहुल राऊत ) आणि सर्वात धाकटी भैरवी ठाकूर (लग्न नंतर भैरवी अतुल माळी).

आम्हा तिघी बहिणींना नेहमीच ताजे सकस घराचे गरम गरम अन्न खायला मिळाले आहे. मम्मी सकाळी सकाळी शाळेत जायची कारण ती झेड पी मध्ये शिक्षिका होती तेव्हा आमचा ताबा 'पपा कडे असायचा. आम्हाला सकाळी नाश्ता म्हणजे दूध आणि बिस्कीट (खारी/ नानखाट्टं किंवा पार्ले जी) तर कधी पोहे, फोडणीचा भात, तांदळाची भाकरी (वाडवळ पद्धतीची ) आणि अंडाकांदा किंवा सुका बोंबील कांदा घालून खमंग तळलेले किंवा ओला बोंबील भाजी किंवा तांदळाची कण्याची पेज. अहाहा तोंडाला आताही पाणी सुटलाय.

पपा अंधेरी ला कामाला जायचे तेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे नुकतेच के जि मध्ये गेलेलो तेव्हा 'पपा त्यांच्या स्कुटी वर सोडायचे शाळेत. नंतर मग 'पपा नी जॉब सोडून आमच्या कडे पूर्ण वेळ लक्ष दिले. सकाळचा नाश्ता करून मग आम्ही थोडी मस्ती थोडा T V आणि अभ्यास करायचो सकाळी अकरा वाजे पर्यंत. आमची दुपारची शाळा असायची साडे बारा ची. 'पपा चा मग साग्र संगीत जेवण बनवण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. आमच्याकडे मंजू ताई नावाची ताई होती आम्हाला सांभाळायला आमच्याच गावाची. मग तिचे लग्न झाल्यावर तिची लहान बहीण वंदना आली. ह्या दोघीनी आमचा खूप छान सांभाळ केला.

तर ह्या वंदना चे काम असायचे सर्व पूर्व तयारी करण्याचे जसे कि भाज्या कापून चिरून ठेवणे, भांडी साफ करून ठेवणे, नारळ किसून देणे, मिरची कोथिंबीर कापून देणे , लसूण आले सोलून देणे इत्यादी. मच्छी मटण चिकन असे काही असले कि ते मात्र 'पपा आणि मम्मी स्वतः साफ करायचे नीट काप कापायचे . आणि मग सुरु व्हायचा 'पपा चा "खाना खजाना " माझे लक्ष जरी अभ्यासात असले तरी 'पपा चे कौशल्य असे असायचे कि त्यांनीही बनवलेल्या जेवणाच्या सुगंधाने आमच्या पोटात कावळे कोकलायला लागायचे.

काय काय नसायचे? पांढर्या वाटाणा ची भाजी, काळ्या वाटाणा ची उसळ, वांगे बटाटा टोमॅटो शेवग्याच्या शेंगांची मिक्स भाजी, उकडदांडी ( हिला उकडहंडी असेही म्हणतात), कधी हिरवा वाटाणा फ्लॉवर ची रस्सा भाजी, किंवा भेंडी, गवार, दुधी, शिराळे टाकून केलेली बिड्याही भाजी (वालाची / डाळिंब्याची आमटी) जोडीला वरण, भात, लोणचे , पापड असा भरगच्च शाकाहारी मेनू. मासे (मच्छी ) असली कि मग कधी मांदेली, बोंबील, घोळ चे खारे (घोळ मासा चे चौकोनी तुकडे, पाला, पापलेट, हलवा (मोठे राखाडी रंगाचे पापलेट ), निवट्या, बोयमासा, कोलंब्या ( छोटी कोळंबी), कस्टड्या (मोठी कोळंबी ), कोलीम ( ह्याच्या पतीच्या हिरव्या कांद्या बरोबर अंडे टाकून केलेल्या वड्या हा माझा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे ). ह्या कोलीम ची एकदा 'पपा नी कांद्याच्या भाजी सारखी कुरकुरीत भजी केली होती अत्यंत स्वादिष्ट. कधी शिंप्या ( तिसऱ्या ) तर कधी खेकडे. ह्यांचे कालवण (रस्सा) आणि तळलेले असे दोन्ही प्रकार होत असत. कधी कधी दोन दोन प्रकार एकदम हि असत. इतकी मज्जा यायची खायला हि आणि त्यांना बनवताना बघायलाही.

कोंबडे (चिकन ) असले कि अनेक प्रकारचे बनायचे कधी साधा रस्सा , तर कधी भाजून रोस्ट केलेलं कांदा खोबरे वाटण टाकून केलेले तर कधी हिरवे ( हि माझ्या 'पपा ची खासियत. रेसिपी विभागामध्ये ह्याची पूर्ण पाककृती तुम्हाला पाहायला मिळेल )

मटण असले कि विविधता असायची जसे कि साधे मटण रस्सा वाले किंवा तुरीची आणि चण्याची डाळ टाकून केलेलं (डाळ गोश्त) , सुक्के मटण किंवा मटण चॉप्स सुक्के, खिमा. खिमा म्हटले कि लोक फक्त कांदा बटाटा मध्ये खिमा मसाला टाकून करतात. पण 'पपा च्या अद्भुत किचन मध्ये त्यावर अनेक प्रयोग केले गेलेले मी चाखलेत.

खिमा मध्ये कधी हिरवे वाटणे तर कधी शेंगदाणे, कधी तुरीची डाळ तर कधी अंडे असे मिक्स मसाला खिमा इतका जबरदस्त लागायचा कि ती चव आजही जिभेवर रेंगाळते ) 'पपा नि आणि मम्मी ने आम्हाला खवय्ये गिरी शिकवली त्यातील बारकाव्या सह . चिंच का टाकावी, किती टाकावी, कशाचे किती माप असावे . चाखून कसे बघावे सर्व बारकावे शिकवले त्यामुळे आम्ही 3 हि बहिणी सुग्रास जेवण बनवायला शिकलो.

आज आमच्या हाताचे खायला मिळावे म्हणून नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी संधी शोधून ठेवत असतात आणि तर्हे तर्हेच्या फर्माईशी होत असतात. आम्हीही आवडीने त्या पूर्ण करतो. अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त लाभलेल्या माझ्या मम्मी 'पपा च्या आशीर्वादाने आम्ही संपन्न झालो. भाग्यच आमचे !

bottom of page